लोणंदमध्ये भरदिवसा अडीच लाखांची रोकड चोरीला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण..चोर CCTV त कैद….!



लोणंद (ता. खंडाळा) | प्रतिनिधी

                    लोणंद शहरात भरदिवसा बॅंकेसमोर अज्ञात चोरट्याने एका इसमाच्या बॅगेवर डल्ला मारून अडीच लाख रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १५ जुलै) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.



🔘 CCTV व्हिडिओ 👇👇






                प्राप्त माहितीनुसार, पीडित व्यक्ती बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लोणंद शाखेजवळ रोख रक्कम घेऊन आले होते. त्याच वेळी अज्ञात चोरट्याने बॅगेवर लक्ष ठेवून संधी साधत बॅग लांबवली. या बॅगेत अंदाजे ₹२,५०,००० ची रोख रक्कम होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती असून, लोणंद पोलिसांनी फुटेज गोळा करून तपास सुरू केला आहे.


दरम्यान, लोणंदसह परिसरात भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच पाडेगाव येथील नेवसेवस्तीमध्ये एका घरात घुसून दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. तर, गेल्या वर्षी शास्त्री चौक परिसरात अशाच पद्धतीने व्यापाऱ्याच्या गाडीतून रोकड चोरीला गेली होती. त्या घटनेचा तपास अद्याप अपूर्णच आहे.


या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि उपलब्ध मनुष्यबळावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मोठा भूभाग असून, पुरेशा मनुष्यबळाअभावी पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या येथे एकच सहायक पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक कार्यरत आहेत.


लोणंदसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी, वाढीव पोलीस कर्मचारी आणि तातडीने गुन्हेगारीवर लगाम घालणारी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments